पुणे: पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर सुरू असलेल्या टोळी संघर्ष अजूनही सुरूच असल्याचे समोर आले आहे. मकोका अंतर्गत अटक करण्यात आलेला गुंड कृष्णा आंदेकर याच्यावर हल्ला करण्याचा कट एका विरोधी गटाने रचल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा हल्ला पोलिसांच्या सुरक्षेत असतानाच करण्याचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला.

कृष्णा आंदेकर, त्याचा भाचा स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर यांना न्यायालयीन सुनावणीसाठी धुळे आणि नंदुरबार कारागृहातून पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात आणण्यात येत होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पोलीस पथक त्यांना घेऊन पुन्हा कारागृहाकडे रवाना झाले. याच वेळी न्यायालय परिसरातून एक दुचाकी संशयास्पद पद्धतीने पोलीस वाहनाचा पाठलाग करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

पुणे शहरातून बाहेर पडल्यानंतरही ती दुचाकी थेट चाकणपर्यंत पोलीस व्हॅनच्या मागे होती. संशय वाढल्यानंतर पोलिसांनी चाकण परिसरात वाहन थांबवून दुचाकीस्वारांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही संशयितांनी दुचाकी जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
यानंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी वेदान्त रोहित सावंत (वय 21, धनकवडी) आणि अथर्व दत्तात्रय खोपडे (वय 21, कात्रज) या दोघांना अटक केली.
तपासात समोर आले की, हे आरोपी पोलिसांच्या वाहनाचे लोकेशन आणि ताफ्याची माहिती मोबाईलद्वारे सूरज अशोक ठोंबरे (वय 24, नाना पेठ) याला देत होते. कृष्णा आंदेकरला रस्त्यात अडवून हल्ला करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणात सूरज ठोंबरे, मानव ढमाले आणि धीरज लखारा यांच्यावरही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे पुण्यातील टोळी संघर्ष पुन्हा चर्चेत आला असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.






