अहमदनगर : नेवासा तालुक्यातील सोनई गावाजवळ चर्चमध्ये गरीब कुटुंबातल्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलींच्या अंगात सैतान आहे, तो काढावा लागेल असे सांगत त्यांना चर्चमध्ये बोलावून अत्याचार केले. मुलींनी अत्याचाराची वाच्यता जर केली तर त्यांची आई आणि आजी मरून जाईल अशी भीती घालण्यात आली होती. मात्र हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील उंबरे, श्रीरामपूर, कोपरगाव या ठिकाणी मुलींवरील अत्याचाराच्या घटना याआधी उघडकीस आल्या आहेत. आता नेवासा तालुक्यातील सोनाई येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला. तुमच्या कुटुंबातील मुलींमध्ये सैतान आहे. त्यामुळे तुमच्या घरावर संकट आले आहे. त्यांना धार्मिकस्थळी पाठवा असे सांगण्यात आले. गेल्या एका महिन्यापासून अगदी पाचवीत शिकणाऱ्या 10 वर्षीय दोन मुलींवर भीती दाखवत अत्याचार करण्यात आले.
अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून उत्तम वैरागर, संजय वैरागर आणी सुनील गंगावणे या तिघांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना अतिशय गंभीर असून आणखी कोणी पीडित असतील तर त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.