छत्रपती संभाजीनगर: खवड्या डोंगरावर घडलेल्या चांदगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर आणि आई संगीता या तिघांचा मृत्यू झाला. सुरुवातीला कुणालने महागड्या आयफोनच्या कारणातून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होती. मात्र आता कुटुंबातील जुने मतभेद आणि तणावाची पार्श्वभूमीही तपासात समोर येत असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतरही कुटुंबातील दुरावा कायम असल्याचे अंत्यसंस्काराच्या वेळी दिसून आले. कुणाल आणि संगीता यांच्यावर मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, तर मुरलीधर यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी धनगर पिंपळगाव येथे करण्यात आले.

दरम्यान, मुरलीधर यांचे वडील दामोदरराव यांनी कुटुंबाच्या जुन्या परिस्थितीबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुरलीधर सुमारे 20 वर्षांपूर्वी नोकरीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरला गेले होते. तेथे त्यांनी विवाह केला; मात्र या लग्नाची माहिती कुटुंबीयांना त्यावेळी मिळाली नव्हती. त्यामुळे वडील आणि मुलामध्ये काही काळ नाराजी होती. मुरलीधर गावाकडे फारसे येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

जमिनीच्या वाटपाबाबतही कुटुंबात मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. दामोदररावांनी मुरलीधर यांना 3 एकर जमीन दिली होती. तसेच मुलींनाही जमिनीतील काही हिस्सा देण्यात आला होता. या वाटपावरून कुटुंबात चर्चा आणि मतभेद असल्याचे सांगितले जाते. याच मतभेदामुळे घरात सतत वाद होत होते त्यामुळे कुणाल तणावात होता.
संगीताचे वडील बबनराव गाभूड यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत काही कौटुंबिक बाबींचा उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी घरगुती कारणावरून मुरलीधर यांचा पत्नी आणि मुलासोबत वाद झाला होता. या घटनेचा कुणालवर काही परिणाम झाला होता का, याचाही तपास व्हावा, असे त्यांनी सांगितले.
घटनेनंतर पोलिसांनी चांदगुडे यांच्या घराची पाहणी करून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. आर्थिक स्थिती, कौटुंबिक संबंध आणि मालमत्तेशी संबंधित बाबी तपासल्या जात आहेत. तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी खवड्या डोंगराची पाहणी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षाव्यवस्थेबाबतही आढावा घेतला आहे.








