पाटस, ता. 23 : पाटस (ता. दौंड) टोलनाक्यावर वाहतूक नियमांना अक्षरशः केराची टोपली दाखवत दोन वाहनचालकांनी बंद असलेले बूम बॅरियर तोडून वाहने सुसाट नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. 22) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने घडलेल्या या दोन्ही घटनांमध्ये टोलनाक्याच्या बूम बॅरियरचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, दोन्ही वाहनचालकांनी वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले. हा संपूर्ण प्रकार टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

तांदुळवाडी येथील रहिवासी व पाटस टोलनाक्यावर लिगल ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले योगेश बाळासाहेब सरोदे यांनी यवत पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 281, 125, 324(4), मोटार वाहन कायदा कलम 184 तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेन क्रमांक 5 मधून महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच 16 ओवाय 4039) जात होती. त्यावेळी लेनवरील बूम बॅरियर बंद असतानाही चालकाने वाहनाचा वेग कमी न करता थेट बूम बॅरियरला धडक दिली. बूम तोडून वाहन पुण्याच्या दिशेने निघून गेले. टोल कंट्रोल रूममधून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सरोदे यांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये पिकअप चालकाने बंद बूम बॅरियर तोडून वाहन पुढे नेल्याचे स्पष्ट दिसून आले.

पाच मिनिटांत हायड्रा क्रेननेही उडवला बूम
पहिल्या घटनेनंतर अवघ्या पाच मिनिटांनी म्हणजे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास लेन क्रमांक 4 मध्ये दुसरी धक्कादायक घटना घडली. हायड्रा क्रेन (एमएच 42 ओ 9270) चालकानेही सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाताना बंद असलेला बूम बॅरियर तोडला आणि वाहन न थांबवता पुढे निघून गेला. दोन्ही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर टोलनाक्याच्या यंत्रणेचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. या वेळी टोलनाक्यावर कर्मचारी ड्युटीवर असल्याने मोठा अनर्थ टळला.
वाहनचालकांची बेदरकारपणा; जीवितास धोका
दोन्ही वाहनचालकांनी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे वाहने चालविली. बंद असलेला बूम तोडून पुढे जाण्याच्या या प्रकारामुळे टोलनाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. या घटनेनंतर टोलनाका प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पोलिसांत तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही वाहनांचा आणि संबंधित चालकांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, बंद बूम बॅरियर दिसत असतानाही तोडून पुढे जाण्याची ही ‘मुजोरी’ नेमकी कशामुळे? दोन्ही वाहनचालकांना पोलिस कधी ताब्यात घेणार, तसेच टोलनाक्याच्या नुकसानीची भरपाई त्यांच्याकडून वसूल होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.







