पुणे: पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील एका 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या तणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील वाढता मानसिक आणि आर्थिक ताण पुन्हा चर्चेत आला आहे.

प्रथमेश दिलीप देशमुख असे मृत तरुणाचे नाव असून तो धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील खासापुरी येथील रहिवासी होता. तो मागील तीन वर्षांपासून पुण्यात राहत होता. गेल्या आठ महिन्यांपासून तो शनिवार पेठेतील नंदन सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास होता.

मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजता प्रथमेश आपल्या खोलीवर परतला होता. मात्र, बुधवारी सकाळी तो बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आणि पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रथमेशवर अंदाजे अडीच लाख रुपयांचे कर्ज होते. त्याने मागे दोन पानी चिठ्ठी ठेवली आहे. या चिठ्ठीत त्याने 18 ते 19 जणांकडून घेतलेल्या पैशांची नोंद केली होती. कोणाकडून किती रक्कम घेतली आणि त्यापैकी किती पैसे परत केले, याचाही उल्लेख त्यात असल्याचे समोर आले आहे.
प्रथमेश यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांची तयारी करत होता. पूर्व परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नसल्याने तो गावी परतण्याचा विचार करत होता, अशी माहिती त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिली. त्याचे वडील हयात नसून आई गावी एकटी राहत होती. त्याला चार बहिणी असून त्यांचे विवाह झाले आहेत.







