पुणे : पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने नाना पेठ परिसरातील अभिलेखावरील आरोपीला कोयत्यासह अटक केली आहे. अक्षय दशरथ अकोलकर (वय ३३, रा. डोके तालीम चौक, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो कथितरीत्या बंडू आंदेकर टोळीशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अकोलकर हा नागझरी नाल्याजवळ थांबला असल्याची माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली. त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने तातडीने परिसरात सापळा रचला. पोलिसांनी अकोलकरला ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोयता आढळून आला.

बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अकोलकरविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खंडणी विरोधी पथकातील सहायक पोलीस फौजदार महेंद्र तूपसौंदर यांनी फिर्याद दिली आहे. अकोलकर याच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, अकोलकर याचा कथित टोळीशी असलेला संबंध आणि त्याच्याकडील शस्त्राबाबतही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. परिसरात गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.







