डॉ. अशोक बालगुडे

पुणे: चारचाकी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी पती, सासू-सासऱ्यांकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप करत २३ वर्षीय गर्भवती आयटी कर्मचाऱ्याने उंड्री-वडाचीवाडी परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. २४) रात्री घडली. वैष्णवी प्रविण जरांडे असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून काळेपडळ पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वैष्णवीचा विवाह ९ मे २०२६ रोजी ओंकार संजय घिसरे याच्याशी झाला होता. लग्नावेळी दहा तोळे सोने, विवाहाचा खर्च आणि पतीच्या मागणीनुसार दुचाकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विवाहानंतर ती काही काळ बंगळुरू येथे नोकरीनिमित्त होती. जूनअखेरीस ती सासरी परतल्यानंतर घरातूनच आयटी कंपनीचे काम करीत होती. याच काळात घरकामावरून टोमणे तसेच पती आणि सासऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे तिने माहेरी सांगितल्याचा दावा आहे.

दरम्यान, चारचाकीसाठी पाच लाख रुपये किंवा गाडी घेऊन देण्याची मागणी पतीने १० जून रोजी तिच्या वडिलांकडे केल्याचा आरोप आहे. लग्नासाठी मोठा खर्च झाल्याने आणखी पैसे देणे शक्य नसल्याचे वडिलांनी सांगितले. त्यानंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी वैष्णवीवर दबाव टाकला जात असल्याचे तिने आईला सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ती गर्भवती असल्याची माहितीही कुटुंबीयांनी दिली आहे.
२४ सप्टेंबरच्या रात्री वैष्णवीने आईला फोन करून सासरी त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर पतीनेही तिच्या आईला फोन करून मुलीला घरी घेऊन जाण्यास सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. कुटुंबीयांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. पहाटे नातेवाइकांनी घरी पोहोचल्यावर वैष्णवी मृतावस्थेत आढळली. तिने पंख्याला गळफास घेतल्याचे सासरच्या मंडळींनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. प्रकरणाचा पुढील तपास काळेपडळ पोलिस करीत आहेत.






