नाशिक : नाशिक आणि सोलापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अल्पवयीन मुलींचे बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न लावून देणाऱ्या कथित बोगस विवाह रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमध्ये 17 वर्षे 8 महिने वयाच्या एका मुलीला जाळ्यात ओढून तिचे सांगोला तालुक्यातील तरुणाशी बनावट लग्न लावून देण्यात आले. मध्यस्थांनी या व्यवहारातून तब्बल 2 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात मुख्य सूत्रधारांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील ही 17 वर्षीय मुलगी आपल्या आईसोबत नाशिक येथे देवदर्शनासाठी आली होती. त्यावेळी तिच्या आईची ओळख माधव कारभारी वाघ याच्याशी झाली. त्याने मुलीच्या आईला 25 ते 30 हजार रुपयांचे आमिष दाखवून मुलीला काही वेळासाठी सोबत पाठवण्यास सांगितल्याचा आरोप आहे.

यानंतर माधव वाघ याने इतर साथीदारांच्या मदतीने मुलीच्या बनावट ओळखीची कागदपत्रे तयार केली. अंजना राजेंद्र देवरे हिला मुलीची खोटी आई, तर राहुल गया शेळके याला खोटा मामा म्हणून उभे करण्यात आल्याचा आरोप आहे. मुलीचे नाव बदलून ‘मरीना देवरे’ असे दाखवण्यात आले. तसेच नाशिक न्यायालयात बनावट स्टॅम्प पेपरवर सह्या आणि बोगस आधार कार्ड सादर करून लग्नासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे.

यानंतर सांगोला तालुक्यातील मानेगाव येथील अमोल दादा कदम याच्यासोबत मुलीचे लग्न ठरवण्यात आले. मध्यस्थांच्या माध्यमातून अमोल कदम आणि त्याच्या नातेवाईकांकडून 2 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलीला मानेगाव येथे पाठवण्यात आले.
मानेगाव येथे पोहोचल्यानंतर मुलीला आपल्यासोबत झालेला प्रकार लक्षात आला. तिने तातडीने आपल्या खऱ्या आईशी संपर्क साधून संपूर्ण घटना सांगितली. तसेच आपले वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट करून लग्नास नकार दिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कदम कुटुंबीयांनी पोलिसांच्या मदतीने मुलीला सोलापूर येथील मुलींच्या निरीक्षण गृहात दाखल केले.
यानंतर सांगोला पोलीस ठाण्यातून शून्य क्रमांकाने वर्ग झालेल्या फिर्यादीच्या आधारे नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात बनावट कागदपत्रे, खोटी ओळख निर्माण करणे आणि अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्याच्या कथित रॅकेटचा पुढील तपास नाशिक आणि सोलापूर पोलिसांकडून सुरू आहे.







