उरुळी कांचन, ता. 23 : ‘तुम्ही आमच्या कारला कट का मारला?’ असा जाब विचारत तीन अनोळखी व्यक्तींनी कार अडवून चालकाला कोयत्याच्या मुठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरीऐंदी फाटा येथे 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या हल्ल्यात चालकाच्या नाकाला दुखापत होऊन रक्तस्राव झाला, तर त्याच्या मित्रालाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.

दशरथ महादेव मोरे (वय 43, रा. भागीरथी नगर, हडपसर) यांनी यवत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे हे व्यवसायानिमित्त टेर्भुर्णी येथे गेले होते. ते मित्र धनराज केवळराम यांच्यासह ग्रँड विटारा कारने हडपसरकडे परतत होते. बोरीऐंदी फाट्याजवळ त्यांच्या कारला पाठीमागून आलेल्या पांढऱ्या मारुती सुझुकी कार (एमएच 14 एमएच 4551) ने अचानक आडवी कार मारल्याने मोरे यांनी आपली गाडी थांबवली.

यानंतर कारमधून तिघे अनोळखी इसम खाली उतरले. त्यापैकी दोघांच्या हातात लोखंडी कोयते असल्याचे तक्रारीत नमूद आहे. ‘आमच्या गाडीला कट का मारला?’ असा जाब विचारत त्यापैकी एकाने कोयत्याच्या मुठीने मोरे यांच्या तोंडावर मारल्याचा आरोप आहे. तर अन्य दोघांनी त्यांच्या मित्राला शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली.

दरम्यान, आजूबाजूला नागरिक जमा होऊ लागल्याचे पाहून तिघांनी घटनास्थळावरून पुण्याच्या दिशेने कारमधून पलायन केले. जखमी मोरे यांनी उरुळी कांचन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर हा प्रकार यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 126(2), 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, कार क्रमांकाच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.







