लातूर : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी काही नगरसेवकांसोबत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र, राजू शिंदे आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
या पाठोपाठ भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. मराठवाड्यातीलच भाजपाचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सुधाकर भालेराव हे शरद पवार गटात प्रवेश करणार असून प्रवेशाची तारीखही ठरली असल्याची माहिती मिळत आहे.
सुधाकर भालेराव हे येत्या 11 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सुधाकर भालेराव हे उदगीरमधील मोठे नेते असून लातूर जिल्ह्यात त्यांचा मोठा दबदबा आहे. त्यांनी पक्ष सोडल्याने भाजपला मोठं नुकसान होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
उदगीरमध्ये संजय बनसोडे यांना तगडं आव्हान
राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात सुधाकर भालेराव हे शरदचंद्र पवार पक्षातून उदगीर विधानसभेच्या मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उदगीरमध्ये संजय बनसोडे यांना मोठं तगडं आव्हान मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.