छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक भीषण आगीची घटना समोर येत आहे. वाळुज एमआयडीसी परिसरातल्या एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये आतापर्यंत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मध्ये ‘सनशाइन इंटरप्राईजेस’ कंपनीत रविवारी ही घटना घडली आहे.
मृत्यूमुखी पडलेले कामगार बिहार राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत आग भडकतच आहे. तसेच आगीचे लोट दूरवर पसरले आहेत.
सनशाइन इंटरप्राईजेस या कंपनीत रबरी हातमोजे बनवण्याचे काम केले जाते. १५ कामगारांसह एक महिला आणि दोन लहान मुले असे एकूण १८ जण येथे काम करतात. या कंपनीत काम करणारे बहुतांश कामगार बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील मिर्झापूर, पंचायत दलोकर या गावाचे रहिवासी आहेत. शिवाय एकजण पश्चिम बंगाल आणि शेजारच्या गावातील असल्याची माहिती आहे.
कामगार झोपेत असताना कंपनीला आग लागली. या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 4 कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला. भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोन मिर्झापूर या सहा कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आगीतून बचावलेल्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील काम बंद झालं आणि रात्री 12 वाजेच्या आसपास सर्व कामगार झोपी गेले. आम्ही सर्वजण अंगावर चादर घेऊन झोपलो होतो. त्यानंतर मध्यरात्री गरम वाफ अंगावर येऊ लागली, त्यामुळे आम्ही जागे झालो. आजूबाजूला पाहतो, तर आग लागली होती.
त्यानंतर कामगारांनी एकमेकांना उठवण्यास सुरुवात केली. त्यानंतर दरवाजाच्या बाजूने आग लागल्यामुळे कामगारांनी वरती चढून पत्र्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. चार जण सुखरुप बाहेर पडले. मात्र, 6 कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.