सेनगाव (परभणी) : विदर्भातील मेंढपाळ असलेल्या अल्पवयीन मुलीवर अनोळखी तरुणाने अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सदर मुलगी गरोदर असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित प्रकरणाला वाचा फुटली. याप्रकरणी सेनगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, ही घटना जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सदर गुन्हा जिंतूर पोलिसांकडे वर्ग केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील एक अल्पवयीन मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत मेंढ्या चारण्यासाठी परभणी जिल्ह्यात गेली होती. सुमारे साडेचार महिन्यापूर्वी ते सर्वजण मेंढ्या घेऊन जिंतूर ते येलदरी रस्त्याने आले होते. यावेळी मुलीला तहान लागल्यामुळे रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या एका झोपडीत पाणी पिण्यासाठी गेली. यावेळी एक तरुण त्या ठिकाणी आला अन् त्याने मुलीवर अत्याचार केला व घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, अचानक झालेल्या या प्रकारामुळे सदर मुलगी घाबरून गेली. तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच त्या मुलीच्या पोटात वेदना होत असल्याने तिला उपचारासाठी रिसोड येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार डॉक्टरांनी रिसोड पोलिसांना कळविला. रिसोड पोलिसांनी सदर गुन्हा सेनगाव पोलिसांकडे वर्ग केला. मात्र घटना जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे सेनगाव पोलिसांनी शनिवारी (दि.२२) गुन्हा जिंतूर पोलिसांकडे वर्ग केला आहे. जिंतूर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केल्याचे सेनगाव पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले.