Marathwada drought : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक 1 हजार 652 गावांचा अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत आहे. मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांत 8 हजार 496 गाव आहेत. 47.42 एवढी सरासरी आणेवारी असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यातील खरीप हंगाम 2023-24 ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली असून, त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे,
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 123 कोटींची मदत अपेक्षित, जालना 115 कोटी, परभणी 9 कोटी, हिंगोली 10 कोटी, नांदेड 5 कोटी, लातूर 16 लाख, बीड सव्वा लाख, धाराशिव 2.5 कोटींचा मदत निधी अपेक्षित आहे.छत्रपती संभाजीनगरमधील 1356 गावं पैसेवारी कमी आलेली गावं आहेत. जालनामधील 971 गावं पैसेवारी कमी आलेली गावं आहेत. परभणीमधील 832 गावं पैसेवारी कमी आलेली गावं आहेत. हिंगोलीमधील 707 गावं पैसेवारी कमी आलेली गावं आहेत. नांदेडमधील 1562 गावं पैसेवारी कमी आलेली गावं आहेत. लातूरमधील 952 गावं पैसेवारी कमी आलेली गावं आहेत. बीडमधील 1397 गावं पैसेवारी कमी आलेली गावं आहेत. धाराशिवमधील 719 गावं पैसेवारी कमी आलेली गावं आहेत. अशी एकूण 8496 गावं आहेत.
मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने मराठवाडा विभागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील खरीप हंगाम 2023-24 ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली असून, ज्यात विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत असल्याचे समोर आले आहे. विभागातील एकूण 56 लाख 15 हजार 10.65 हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. मात्र, लांबलेल्या पावसामुळे त्यापैकी 50 लाख 97 हजार 606.62 हेक्टरवर पेरणी झाली. तर 4 लाख 79 हजार 866.61 क्षेत्र पडीक राहिले आहे. जुलै महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.