Dharashiv News : धाराशिव : 2023 या वर्षात धाराशिव जिल्ह्यात १६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. विविध प्रकारे शेतकऱ्यांनी त्याचे जीवन संपवले. खरतर आकडेवारी यापेक्षाही मोठी असल्याचे काहींचे म्हणणे आहे. मात्र, सरकारी नोंदीतून ही आकडेवारी समोर आली आहे. सततची नापिकी, वाढणारा खर्च आणि कर्जबाजारी झाल्याने या आत्महत्या होत असल्याचे सांगितले जात आहे. जानेवारी २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या अकरा महिन्यातील ही आकडेवारी आहे.
यावरून दर दोन दिवसात एक शेतकरी आत्महत्या करत असल्याची नोंद जिल्ह्यात होत असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीतील ८० शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे मदतीस पात्र ठरली आहेत. तर १८ कुटुंबे अपात्र ठरली आहेत.
जुलै ते नोव्हेंबर या कालावधीतील साठ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे आणखी सरकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहेत. चौकशीवरून पात्र अपात्र कुटुंबे ठरणार असून त्यातील किती कुटुंबे मदतीस पात्र होतील हा प्रश्न अद्याप शासकीय फायलीत अडकून राहिला आहे. परिणामी त्यांना अद्याप शासकीय मदत मिळू शकलेली नाही.