संभाजीनगर: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’चा (Chief Minister’s Prosperous Panchayat Raj Mission) राज्यस्तरीय शुभारंभ आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांनी राज्यातील एक कोटी महिलांना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्धार व्यक्त केला. या योजनेंतर्गत महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, “जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील लाडक्या बहिणींना एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. या कर्जातून त्या उद्योग-व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. राज्यातील एक कोटी बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा आमचा संकल्प आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत असून, राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे.
राज्यभरात गावागावांमध्ये ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.







