केज : ऐन विधासभा निवडणुकीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बीडच्या केज तालुक्यातील बनसारोळा येथे पोलिसांनी ५६ लाखांचा गांजा जप्त केला आहे. सरकारी गायरान जमिनीत अज्ञात व्यक्तींनी गांजाची लागवड केली होती. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफवडगाव पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनसारोळा येथील पारधी वस्ती जवळ असलेल्या सरकारी गायरान जमिनीत तुरीच्या पिकात गांजाची झाडे लावली असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे आणि त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे, सहाय्यक फौजदार अशोक थोरात यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.
यावेळी पोलिसांना तुरीच्या शेतात अज्ञात इसमाने मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली असल्याचे आढळून आले. याबाबत पोलिसांनी गांजाची सर्व झाडे ताब्यात घेतली आहे. गांजाचे वजन 550 किलो असून त्याची किंमत 56 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गांजाची नेमकी लागवड कोणी केली? याचा तपास पोलीस करत आहेत.