छत्रपती संभाजीनगर: एखाद्या सस्पेन्स (Crime News) थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल असा भयानक खुनाचा प्रकार शहरात उघडकीस आला आहे. शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजचे निवृत्त सिव्हिल विभागप्रमुख (HOD) प्रा. राजाराम उत्तम लोंढे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, आरोपींनी केवळ खूनच केला नाही, तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनाव रचला होता. मात्र, तांत्रिक तपासाच्या जाळ्यात अडकलेल्या आरोपींचे ‘पितळ’ अखेर उघडे पडले आहे.

नेमकं प्रकरण काय?
आरोपी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे यांनी ‘खतरों के खिलाडी’सारखा एक शो सुरू करण्याच्या बहाण्याने प्रा. लोंढे यांच्याकडून सुमारे 50 लाख रुपये घेतले होते. निवृत्तीनंतर मिळालेले कष्टाचे पैसे अडकल्याने लोंढे वारंवार तगादा लावत होते. याच त्रासातून सुटका करून घेण्यासाठी आरोपींनी त्यांचा काटा काढण्याचे ठरवले. 6 फेब्रुवारी रोजी आरोपींनी लोंढे यांना दौलताबाद परिसरात पार्टीसाठी बोलावले. पार्टी संपवून परतत असताना, लोंढे यांच्याच पिस्तुलातून त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांचा खून करण्यात आला. यानंतर सुरू झाला पोलिसांना गुंगारा देण्याचा खेळ.

लोंढे जिवंत आहेत असे भासवण्यासाठी त्यांचा मोबाईल ठिकठिकाणी ऑन-ऑफ करण्यात आला. दुसऱ्या दिवशी गेवराई तांडा परिसरात ‘गुप्तधन’ शोधण्याच्या बहाण्याने एका जेसीबी चालकाकडून खड्डा खणून घेतला आणि कोणालाही कळू न देता त्यात प्राध्यापकांचा मृतदेह पुरला.

पोलिसांनी गुंता कसा सोडवला?
लोंढे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तपास सुरू केला. आरोपींनी लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याचा खोटा जबाब दिला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींची गाडी आणि त्यांचे लोकेशन यात मोठी तफावत आढळली. तांत्रिक विश्लेषण आणि संशयितांच्या जबाबातील विरोधाभासामुळे रीलस्टार विशाल राठोडने गुन्ह्याची कबुली दिली आणि हा थरार समोर आला.







