crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलेल्या एका प्रकरणाने कौटुंबिक नात्यांतील तणाव आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा अधोरेखित केला आहे. 22 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या 37 वर्षीय पतीवर गंभीर आरोप करत मानसिक आणि शारीरिक छळाची तक्रार जिन्सी पोलीस ठाणे येथे नोंदवली आहे. या प्रकरणात पतीसह सासरच्या एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (crime)

तक्रारदार महिलेचा विवाह 6 मार्च 2022 रोजी भोकरदन येथील युवकासोबत झाला होता. लग्नावेळी तिच्या कुटुंबाने एक तोळा सोन्याची अंगठी, सुमारे 30 हजार रुपये आणि संसारोपयोगी साहित्य दिले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच परिस्थिती बदलू लागली. गर्भपातासारख्या संवेदनशील घटनेनंतरही तिला आधार मिळण्याऐवजी घरात छळाला सामोरे जावे लागल्याचा आरोप तिने केला आहे.
तिच्या म्हणण्यानुसार, सासू, सासरे, जेठाणी, देवर आणि नणंद यांच्याकडून सतत त्रास दिला जात होता. किरकोळ कारणांवरून शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक दबाव ही तिच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली होती. पुढे तिला मुलगा झाला, तरी परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. 26 जून 2025 रोजी पतीने व्यवसायासाठी माहेरहून 5 लाख रुपये आणण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने छळ अधिकच वाढल्याचा आरोप तिने केला आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पतीचे एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत संबंध असल्याचा आरोप. संबंधित व्यक्तीला घरी आणून पत्नीला खोलीबाहेर काढले जात असल्याचेही तिने नमूद केले आहे. या घटनांमुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिलेने अखेर आई-वडिलांकडे आश्रय घेतला.







