नांदेड: काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबतच २० नोव्हेंबर रोजी नांदेड लोकसभेच्या जागेसाठी मतदान पार पडणार आहे. दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या प्रकृतीबाबत समस्या निर्माण झाली होती. त्यांना उपचारांसाठी हैदराबाद येथे दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते.
चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभेच्या जागेवर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर काँग्रेसने चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.