जालना: याद राख, माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस, असा थेट इशारा राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. मंत्री छगन भुजबळांनी मराठा आरक्षण आंदोलनवरून जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जालन्यामधील अंबड या ठिकाणी शुक्रवारी ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भुजबळ बोलत होते.
पुढे छगन भुजबळ म्हणाले की, आंदोलनादरम्यान भेटायला गेलेले निवृत्त न्यायमुर्ती त्याला सर सर म्हणत होते, तो पाचवी पास तरी आहे का? याद राख, शेपटी वर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस. हा काही पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. आता प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात असे मिळावे झाले पाहिजेत. ओबीसींची संख्या ही जास्त असून महाराष्ट्रातही जातीय जनगणना तातडीने झाली पाहिजे.
गृहमंत्र्यांनी माफी मागितली आणि..
पोलिसांचा लाठीचार्ज सर्वांनी पाहिला, पण त्यामध्ये 70 पोलिस रुग्णालयात जखमी झाले, हे कोणी पाहिले नाही. जेव्हा पोलीस उठवायला गेले, तेव्हा जरांगे यांनी सर्व तयारी केली होती, पोलिसांवर दगडाचा मारा सुरु झाला. 70 पोलीस हे काय पाय घसरून पडले का? त्यांना कोणी मारले? छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सुनेला सुद्धा आई म्हणून परत पाठवलं, तेथील महिला पोलिसांवर देखील दगडफेक केली. तसेच लाठीचार्ज झाल्यावर हे जरांगेहे घरात जाऊन बसले. महाराष्ट्रासमोर खरं चित्र आले नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनीच माफी मागितली आणि गुन्हे मागे घेण्याचं जाहीर केलं. त्यामुळे पोलिसांचे मनोबल खचलं, असंही भुजबळ म्हणाले.