जालना : जालना जिल्ह्यातील अंबड येथील सभेतून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ म्हणाले की, “मराठा समाजाचे नवीन झालेल्या नेत्यांना हे आरक्षण कळणार नाही, ते त्यांच्या डोक्याच्या बाहेरचं आहे. सारखा कुणाचं खाताय म्हणतो, अरे तुझं खातो काय?, यांना काहीच माहित नाही. अरे आरक्षण काय आहे, हे तर आधी समजून घे, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. छगन भुजबळ हा दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला, असा म्हणतो, हो खातो बेसण भाकर आणि कांदा, आजही खातो. पण, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी राहून तुकडे मोडत नाही, असा मनोज जरांगेंना टोला लगावला आहे. आम्हाला सुद्धा लेकरं आहे, तुम्ही तुमचं वेगळ आरक्षण घ्या, असे छगन भुजबळ म्हणाले.
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी शुक्रवारी जालन्यातील अंबडमध्ये ओबीसींची जाहीर सभा झाली. ओबीसीमधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी सर्वप्रथम मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता त्यांना इतर ओबीसी नेत्यांचा देखील पाठिंबा मिळाला आहे.