अकोले : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. नितीन गडकरींची भाजपमधील काहींना अडचण होत आहे. त्यामुळे गडकरींना बाजूला करण्याचा घाट घातला जातोय. मात्र, गडकरी बाजूला होत नसल्याने त्यांना भाजपचेच काही लोक त्यांना अडकवण्याचा कट रचत आहेत. यासाठी नागपुरातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गडकरींनी लाच मागितल्याचे वदवून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
अकोल्यात रविवारी (ता. १०) रात्री मुस्लिम समाजाच्या एका बैठकीत ते बोलत होते. देशात दलित आणि आदिवासींची जेवढी ताकद आहे, तेवढीच मुस्लिमांची आहे. मात्र, मुस्लिम आपली ताकद ओळखत नाही हेच त्यांचे दुर्दैव आहे. तुम्ही जागे झाले नाही, तर पुन्हा एक नवीन गोधरा, अखलाक किंवा फिलिपिन्स होईल हे लक्षात ठेवा, असे सांगत आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाला खडे बल सुनावले. मुस्लिम समाजाने कानात सांगणाऱ्यांचं ऐकायचं बंद करावे. यासोबतच या निवडणुकीत तुम्ही मुस्लिम म्हणून मतदान केले तरच टीकू शकाल असा इशारा देखील त्यांनी दिला.
पण हारलो किंवा जिंकलो तरी आपणच सिकंदर ठरणार असल्याचं सांगत आंबेडकरांनी त्यांच्या भूमिकेविषयी आणखी संदिग्धता वाढवलीय. आंबेडकर म्हणाले की, निवडणुकीदरम्यान संविधान बदलाचे आणि मुस्लिमांना लक्ष्य करण्याची सुरूवात होईल. गोळवलकरांच्या एका पुस्तकावर हे सरकार चालतंय. रवींद्र वायकर यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहायचा खूप प्रयत्न केला. मात्र, जेव्हा पलीकडून फास आवळला गेला तेव्हा त्यांना पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. त्यामुळे ते शिंदे गटात गेले. मला वाटतं महाविकास आघाडी होण्यात मोठ्या अडचणी आहेत. पंधरा जागांवर तीनही पक्षांची भांडणे आहेत. १४ तारखेपर्यंत त्यांची भांडण सुटली तरच आमच्याशी वाटाघाटी होऊ शकेल. आम्ही दिल्या तेवढ्या जागा लढू, असेही आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, मुस्लिम समाजाला आपली ताकद ओळखायचे आवाहन देखील या वेळी आंबेडकर यांनी केले.