बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघालं आहे. या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून या हत्येप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवरही आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच आता एसआयटीच्या तपासात संतोष देशमुखांच्या हत्येबाबत मोठा आणि धक्कादायक पुरावा समोर आला आहे. यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी गुन्हेगारांनी वापरलेल्या हत्यारांची यादी उघड झाली आहे.

एसआयटीच्या तपासात आरोपींनी हत्येसाठी एक 41 इंच लांबीचा गॅस सिलेंडर पाईप, ज्याची एक बाजू गोलाकार केलेली आणि त्यावर काळ्या दोऱ्याने गुंडाळून मुठ तयार केलेली आहे. याशिवाय एक लोखंडी अर्धा इंच पाईप आणि त्यात लोखंडी तारेचे पाच क्लच वायर वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु, अद्याप सीआयडीला तलवारीसारखे धारधार शस्त्र, चार लोखंडी रॉड, कोयता, फायटर ही हत्यारं अद्याप सापडून आलेली नाहीत. सापडलेली नाहीत. त्यामुळे ती आरोपींनी नेमकी कुठे टाकली? याबाबतचा तपास अजूनही सुरू आहे.
कृष्णा आंधळे अजूनही फरार..
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळे अखेर बीड पोलिसांनी बुधवारी आंधळेला फरार घोषित केलं आहे. पोलिसांनी आंधळेचा महाराष्ट्रासह शेजारील राज्यात देखील शोध सुरू केला आहे. तसंच त्याला अटक करण्यासाठी आवश्यक माहिती देणाऱ्यांसाठी बक्षीस देखील जाहीर करण्यात आला आहे. मात्र, तरीही अद्याप कृष्णा आंधळेचा ठावठिकाणा पोलिसांना समजू शकलेला नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबियांकडून पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली जात आहे.








