बीड : बीड लोकसभेच्या निवडणुकीत विजयी ठरलेले बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. बजरंग सोनवणे हे त्यांच्या विजयानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यांचा अपघात झाल्यावर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. मात्र, गाडीतील सर्व जण सुखरूप असल्याची माहिती आहे.
राज्यात बीडची निवडणूक ही लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला होता. बीडमध्ये जरांगे फॅक्टर चालल्याचं बोललं जात होतं. बजरंग सोनवणे यांनीही ते कबुल केलं आहे. त्यानंतर बजरंग सोनावणे हे मध्यरात्रीच जरांगेच्या भेटीसाठी निघाले त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक अधिकारी कडून विजयाचे पत्र घेतल्यावर बजरंग सोनवणे यांनी जोरदार जल्लोष केला. या नंतर सोनावणे हे काल रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत जात होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणेंच्या गाडीला धडकल्यामुळे अपघात झाला.
गाडीतील काही जण किरकोळ जखमी झाले. त्यांना जवळील दवाखान्यात उपचार करण्यात आले. यानंतर सोनवणे हे अंतरवली सराटी येथे गेले. त्यांनी मनोज जरांगे पाटील भेट घेत विजय साजरा केला.