Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण विभागाचा सावळागोंधळ पहायला मिळाला आहे. ४ वर्ष जुनी प्रश्नपत्रिका पुन्हा नव्याने विद्यार्थ्यांना सोडवायला दिली आहे. चक्क 2019 चाच पेपर पुन्हा 2023 च्या परीक्षेत देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बार्टी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारने परीक्षा घेतली. राज्यभरात ही परीक्षा झाली आहे. मात्र याच परीक्षेत प्रश्नपत्रिकांचा वेगळाच गोंधळ समोर आला आहे. 2019 प्रश्नपत्रिका 2023 च्या परीक्षेत जशाचतशी छापण्यात आली आहे.
राज्यभरात बार्टी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारने परीक्षा आयोजित केली आहे. मात्र, प्रश्नपत्रिका पाहताच परीक्षा केंद्रातील विध्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. अगदी प्रश्न आणि प्रश्नांचा क्रम सुद्धा तोच आहे. आता यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 2019 पेपरच्या माध्यमातून अभ्यास केला आहे, त्यांना या परीक्षेत पूर्णपैकी पूर्ण गुण मिळण्याची सुद्धा शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सतत गोंधळ पाहायला मिळतोय. काही परीक्षेत प्रश्न चुकीचे असतात, तर काही ठिकाणी पर्याय चुकीचे दिल्याचे पाहायला मिळाले आहेत. अनकेदा अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न देखील विचारण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यात आता याची घटनेची भरती झाली आहे.