छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज एमआयडीसी परिसरात बी.टेकच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, तिचे अश्लील फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याशी बळजबरीने लग्न केले. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी ऋतिक सांडू सलामपुरे (वय 23) याने बी.टेकच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिच्या काही खासगी क्षणांचे फोटो मोबाईलमध्ये काढले. या फोटोंचा वापर करून त्याने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

त्याने या फोटोंच्या आधारे तिला धमकावले आणि तिच्यासोबत बळजबरीने लग्न केले. लग्नानंतरही त्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी ऋतिक सांडू सलामपुरे आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असुन पुढील तपास पोलीस करत आहेत.







