पुणे: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आज (August 28) किल्ले शिवनेरीवरून मुंबईतील आझाद मैदानाकडे रवाना होणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा नारायणगाव, मंचर, चाकण, तळेगाव, लोणावळा या प्रमुख मार्गांनी जाणार असल्यामुळे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण, तळेगाव, देहूरोड, भोसरी आणि निगडीसह इतर भागांतील रस्त्यांवर हे बदल लागू राहणार आहेत.

प्रमुख पर्यायी मार्ग

- मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहने: ही वाहने द्रुतगती मार्गावरून उसें टोल नाका येथे उतरून सोमाटणे एक्झिट-सेंट्रल चौक-भक्ती शक्ती चौकमार्गे नाशिक फाट्याला पोहोचतील. त्यानंतर भारत माता चौक, देहू फाटा आणि चाकण बायपासमार्गे नाशिककडे जातील.
- शिक्रापूरकडून पुण्याकडे येणारी वाहने: शिक्रापूरहून येणारी वाहने चाकण चौकातून माणिक चौकातून डावीकडे वळतील. ती भारत माता चौक आणि नाशिक फाटा मार्गे त्यांच्या इच्छित स्थळी जाऊ शकतील.
- मुंबईहून चाकणकडे जाणारी वाहने: या वाहनांना सेंट्रल चौक आणि तळवडे गावठाण चौकातून वळवण्यात येणार आहे.
- जुना पुणे-मुंबई महामार्ग (सोमाटणे ते तळेगाव): सोमाटणे आणि तळेगावकडून मुंबईला जाणाऱ्या वाहनांना मुकाई चौकातून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचा वापर करावा लागेल.
हे सर्व बदल आज पहाटेपासून लागू झाले आहेत आणि मोर्चा पुणे ग्रामीण हद्दीतून बाहेर पडेपर्यंत कायम राहतील. केवळ अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व वाहनांसाठी हे नियम लागू आहेत. पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.







