जालना: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार राजेश टोपे यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात त्यांची गाडी उभी असताना अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
सध्या जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. राजेश टोपे यांची गाडी जिल्हा बँकेच्या परिसरात उभी होती. तेव्हा अज्ञातांनी कारच्या समोरील काचेवर दगडफेक करत गाडीवर ऑइलही फेकलं आहे.
याबाबत ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना राजेश टोपे यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. आमदार राजेश टोपे म्हणाले, “लोणीकरांच्या समर्थकांनी जिल्हा बँकेच्या परिसरात आणि माझ्या गाडीवर दगडफेक केली आहे. यात गाडीची काच फुटली आहे. ही गोष्ट अत्यंत निषेधार्य आहे.” असंही टोपे म्हणाले.