परभणी : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बी एस कांबळे या सामाजिक कार्यकर्त्यांने आत्महत्या करत एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये बाबाजानी दुर्राणी यांच्यासह अजून एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. या दोघांनी त्रास दिल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्या चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यानंतर पाथरी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याने दुर्राणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पाथरी येथील 60 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण कांबळे यांनी मंगळवारी पहाटे शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईट नोट लिहिली होती. या सुसाईट नोटमध्ये बाबाजानी दुर्राणी आणि इतर एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिठ्ठी मिळाल्यानंतर कांबळे यांच्या नातेवाईकांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सायकाळी साडेसात वाजता कांबळे यांचा मुलगा अजयसिंह याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना आपल्या वडिलांचे नावे असलेला माजलगाव रोडवरील कॅनालजवळील प्लांट तसेच शेत जमीनीमधील पडलेले प्लॉटिंग यातील ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत, त्यामुळे वडील तणावात असायचे अशी माहिती दिली.