बीड : खंडणी प्ररकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. परळी शहर सध्या कडकडीत बंद ठेवण्यात आले असून कराडच्या समर्थकांनी रस्त्यांवर टायर पेटवून या गोष्टीचा निषेध केला जात आहे. वाल्मिक कराडवर पवनचक्की कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या मुळाशी हेच खंडणी प्रकरण असल्याचा संशय पोलिसांना आहे. आज मकरसंक्रांत असल्याने बाजारपेठ गर्दीने सजली होती. मात्र, वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी बंदची हाक समर्थकांनी दिली. त्यामध्ये मुख्य बाजारपेठ मोंढा, टावर, बाजार समिती रोड, बस स्टँड रोड सगळं बंद झालं.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावावा अशी देशमुख कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. याआधी वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण गेला होता. मात्र, त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती.
त्यासाठी देशमुख कुटुंबानं सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं होतं. या आधी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता वाल्मिक कराडलाही या कायद्याच्या अंतर्गत आणण्यात आलं आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करण्यासाठी नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये वाल्मिक कराडशी संपर्कात असलेल्या अधिकाऱ्यांना वगळण्यात आलं आहे.