धाराशिव: अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू होते. सध्या त्यांनी उपोषण काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. ओमराजेंविरोधात रात्री आंदोलन करण्यात आले. त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांनीही ओमराजेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून जर आमच्या मागण्या कळत नसतील तर खासदारांनी गप्प बसावे, असं म्हटलं आहे.
धाराशीवमध्ये खासदार ओमराजें विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आरक्षण केंद्र सरकारच्या हातात आहे, केंद्र सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी केली होती. निंबाळकरांच्या या वक्तव्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी आहे. मात्र, ओमराजेंनी केंद्र सरकारनं ५० टक्के मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओमराजेंच्या फोटोला जोडे मारण्यात आले.