बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींशी असल्याच्या संबंधावरून राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आता धनंजय मुंडे यांच्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत येणार असल्याचे समोर येत आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर हे अडचणीत सापडले आहेत. एका तरुणाला मारहाण करत असतानाचा खिंडकरांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर दादासाहेब यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या घरावर केला होता हल्ला…
दादासाहेब खिंडकर हा राष्ट्रवादीचा स्थानिक नेता असून तो सरपंच आहे. खिंडकरावरही अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या घरावर दादासाहेब खिंडकर याने हल्ला केला होता. याबरोबरच त्यांच्या कारची तोडफोड केल्याप्रकरणी दादा खिंडकर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आता त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केल्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. दादासाहेब खिंडकर हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नेता आहे.








