Accident News: अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरुड-राजुरा बाजार मार्गावर मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात (Accident) झाला. एसटी बस आणि प्रवासी ऑटो यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने शाळकरी मुलांसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वरुड येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी रोजप्रमाणे शाळेसाठी सकाळी ऑटोने वरुडकडे निघाले होते. त्याच वेळी समोरून येणाऱ्या एसटी बसने ऑटोला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की ऑटोचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. रस्त्यावर रक्ताचे डाग, वाहनांचे तुकडे आणि जखमींच्या किंकाळ्यांमुळे परिसर हादरून गेला.

या अपघातात ऑटोमधील शाळकरी मुलासह अन्य तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांना तातडीने वरुड येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींना पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.

घटनेची माहिती मिळताच वरुड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत व बचावकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात पोहोचवले. काही काळासाठी वरुड-राजुरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वेगावर नियंत्रण नसणे आणि रस्त्याची अरुंद अवस्था हे संभाव्य कारण मानले जात आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.






