लातूर : खरेदी केलेल्या प्लॉटची ग्रामपंचायतीच्या आठ- ‘अ’ ला नोंद घेण्यासाठी दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या एका ग्रामविकास अधिकाऱ्याला दीड हजार रुपयांच्या लाचेसह रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना रेणापूर येथे सोमवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास घडली. लाचखोर ग्रामविकास अधिकारी हा रेणापूर तालुक्यातील नरवटवाडी व रामवाडी या दोन गावांचा ग्रामविकास अधिकारी आहे.
रेणापूर तालुक्यातील नरवटवाडी येथील फिर्यादीने १६.६ बाय ६२ फूट प्लॉटची खरेदी केली होती. त्या प्लॉटची फिर्यादीच्या नावावर आठ अ मध्ये नोंद घेण्याची मागणी प्लॉट मालकाने नरवटवाडीचे ग्रामविकास अधिकारी महादेव राम कांबळे (वय ४६, रा. सानेगुरुजी शाळेजवळ, अवंती नगर, लातूर) यांच्याकडे केली. या कामासाठी महादेव कांबळे याने तक्रारदाराकडे दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाच देणे न आवडल्याने तक्रारदाराने लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची खातरजमा केली. सोमवारी (दि.२३), दुपारच्या सुमारास रेणापूर येथील कामखेडा चौकात दीड हजार रुपयांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी महादेव कांबळे याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरोधात रेणापूर पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लातूरचे उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, हेड कॉन्स्टेबल फारुक दामटे, भागवत कठारे, भीमराव आलुरे, श्याम गिरी, शिवशंकर कच्छवे, संदीप जाधव, रुपाली भोसले, शहाजान पठाण, मंगेश कोंडरे, गजानन जाधव, किरण गंभीरे यांनी ही कामगिरी बजावली.