छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावरून पडून कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर आणि आई संगिता यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेत आता कौटुंबिक वादाची बाजू समोर आली आहे. सुरुवातीला या घटनेमागे आयफोनशी संबंधित वाद असल्याची चर्चा होती. मात्र, पोलिसांनी आयफोन हे कारण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर मुरलीधर आणि संगिता यांच्यातील कौटुंबिक मतभेद या घटनेशी संबंधित असल्याचा दावा नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

मुरलीधर यांची बहिणी शोभा मस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरलीधर यांचा गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आई-वडिलांशी आणि बहिणींशी पुन्हा संपर्क वाढला होता. तब्बल 17 वर्षांपासून कुटुंबात दुरावा होता. मात्र, मागील चार महिन्यांत मुरलीधर यांनी आपल्या माहेरच्या कुटुंबाशी जवळीक वाढवल्याने संगिता नाराज असल्याचे शोभा यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी कर्जमाफीच्या कामासाठी मुरलीधर गावाकडे गेले होते. त्यावेळी पत्नी आणि मुलाकडून आपल्याला शिवीगाळ करून घराबाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी बहिणीला सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ट्यूशन, मोबाईलचे हप्ते आणि घरभाडे यांसारख्या खर्चाची जबाबदारीही मुरलीधर यांच्यावर होती, अशी माहिती शोभा यांनी दिली.

दरम्यान, मुरलीधर, संगिता आणि कुणाल यांच्या अस्थींचे रविवारी पैठण येथे गोदावरी नदीत एकत्र विसर्जन करण्यात आले. मुरलीधर यांच्यावर गावी, तर संगिता आणि कुणाल यांच्यावर मुकुंदवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
कुटुंबातील जुन्या वादाचा कुणालवरही परिणाम झाला होता, असा दावा नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणामागील नेमके कारण काय होते, हे तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.







