पुणे: कोरेगाव पार्क परिसरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी संबंध ठेवण्यात आले. त्यानंतर ती गर्भवती झाल्याचे समोर आल्यानंतर तिच्यावर कथितपणे दबाव टाकून गर्भपात करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एका तरुणासह डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश विश्वकर्मा (वय 24, रा. धानोरी) आणि डॉ. एस. बी. बरूटे (रा. विश्रांतवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही सध्या फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पीडित मुलगी आई आणि भावासोबत कोरेगाव पार्क परिसरात राहत असून ती 12 वीच्या वर्गात शिकत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणासाठी ती एका बालसंगोपन केंद्रात काम करत होती. याच ठिकाणी तिची ओळख आकाश विश्वकर्मा याच्याशी झाली.

ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर आकाशने लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने तिला लोहगाव परिसरातील एका लॉजमध्ये नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
20 जुलै रोजी मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. तिने ही माहिती आकाशला दिल्यानंतर त्याने तपासणीच्या नावाखाली तिला विश्रांतवाडीतील रुग्णालयात नेल्याचा आरोप आहे. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही डॉक्टरने बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याचा आरोप पोलिसांनी नोंदवला आहे.
गर्भपात झाल्यानंतर मुलीने आकाशशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोबाईल बंद असल्याने तो फरार झाल्याचे तिच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर तिने एका शिक्षिकेकडे आपली व्यथा सांगितली. शिक्षिकेच्या मदतीने कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.







