पुणे: श्रावण महिना म्हटला की भगवान महादेवाची भक्ती, उपवास आणि शिवपूजेचे वातावरण पाहायला मिळते. आज 24 ऑगस्ट रोजी श्रावणातील दुसरा सोमवार असल्याने देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी आणि पूजेसाठी गर्दी करत आहेत. या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करण्याबरोबरच विविध वस्तू वाहण्याची परंपरा आहे.

यामध्ये तिळांचाही समावेश होतो. मात्र पूजा करताना पांढरे तीळ वापरावेत की काळे तीळ? याबाबत अनेक भाविकांमध्ये संभ्रम असतो. धार्मिक परंपरांमध्ये दोन्ही प्रकारच्या तिळांना स्वतंत्र महत्त्व दिले जाते.

सामान्य शिवपूजेसाठी पांढऱ्या तिळांचा वापर केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार पांढरे तीळ शुद्धता आणि सात्त्विक भावनेशी जोडले जातात. शिवलिंगावर ते अर्पण करताना भक्त भगवान शिवाची कृपा आणि मनःशांतीसाठी प्रार्थना करतात. यावेळी ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करण्याचीही प्रथा आहे.

काळ्या तिळांचा वापर मात्र काही विशिष्ट धार्मिक विधींमध्ये अधिक केला जातो. पितृकर्म, शनीशी संबंधित पूजा किंवा काही दोषनिवारणाच्या धार्मिक उपायांमध्ये काळ्या तिळांना महत्त्व असल्याचे मानले जाते. काही ठिकाणी शिवपूजेतही काळे तीळ अर्पण करण्याची पद्धत असली तरी पांढरे तीळ अर्पित करावे.
मात्र यासाठी सर्वत्र एकच नियम लागू होत नाही. कोणत्या प्रकारचे तीळ वापरायचे हे संबंधित पूजा, संकल्प आणि स्थानिक धार्मिक परंपरेनुसार बदलू शकते. विशेष विधी असल्यास पुरोहित किंवा धार्मिक जाणकारांचा सल्ला घेणे योग्य ठरू शकते.







