मुंबई: मीरा रोडच्या नयानगर परिसरात अल्पवयीन मुलींच्या आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओशी संबंधित गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 42 वर्षीय महिलेसह तिच्या 46 वर्षीय प्रियकराला अटक केली आहे. दोघांविरोधात गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या तपासात या प्रकरणाची माहिती समोर आली. संबंधित महिला पतीपासून वेगळी राहत असून तिच्यासोबत 22 वर्षांचा मुलगा आणि 13 व 10 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुली राहत होत्या. मार्च महिन्यात दोन्ही मुली झोपलेल्या असताना महिलेने त्यांच्या नकळत मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे.

यानंतर तिने हे फोटो आणि व्हिडिओ तिच्या प्रियकराला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवल्याचे तपासात समोर आले. आईकडूनच अशा प्रकारे मुलींचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आल्याने या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराने केवळ अल्पवयीन मुलींचेच नव्हे, तर इतर काही व्यक्तींचे तसेच एकमेकांचेही व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ते शेअर केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणामुळे नयानगर आणि मीरा रोड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणातील डिजिटल पुरावे, व्हिडिओ आणि इतर संबंधित बाबींचा तपास केला जात आहे. पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.







