छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेत जीवन संपवलं आहे. या प्रकरणात मुलीला त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणाकडून दिल्या जाणाऱ्या धमकीमुळे मुलीने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’ अशी धमकी आरोपीच्या भावाकडून पीडितेच्या कुटुंबीयांना दिली आहे. या घटनेविरोधात छत्रपती संभाजीनगरमधून निषेध व्यक्त करत गावकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. या घटनेत दोषीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाच्या जाचाला कंटाळून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी (दि. १८) संभाजीनगरच्या ओव्हर गावात घडली आहे. पूजा शिवराज पवार असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. ‘तू माझ्याशी बोलली नाहीस, तर तुझ्या भावाला जीवे मारून टाकीन,’ अशी धमकी पूजाला सतत दिली जात होती. त्यामुळे रोजच्या त्रासाला कंटाळून पूजाने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. कासीम पठाण असं आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कासीमसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि आरोपीला अटक केल्यानंतर देखील त्याच्या कुटुंबीयांकडून पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात होत्या. ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’ असं म्हणत चाकू, तलवार दाखवून आरोपीच्या भावाकडून धमकी दिल्याचा आरोप आत्महत्या करणाऱ्या पूजाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, पूजा ही अकरावी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये तिने क्लास लावला असल्याने ती शहरातच राहत होती. रक्षाबंधन सणासाठी ती दोन दिवसांपूर्वी गावाकडे गेली होती. मागील आठ महिन्यांपासून आरोपी कासिम हा प्रेम कर, अशी बळजबरी करुन मुलीला त्रास देत असायचा. ही बाब तिने तिच्या कुटुंबियांना देखील सांगितली होती. पूजाच्या कुटुंबीयांनी चार ते पाच वेळेस त्याला समजावूनही सांगितले होते.