छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका गावात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचे कसं असा प्रश्न उपस्थित केला आहे. बाळू ज्ञानोबा जाधव असे या नराधमा आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पहिलीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी दुपारी शाळेतून घरी जात होती. आरोपी बाळू जाधव याने सदर मुलीला तुला पेरू देतो, असे म्हणून त्याच्या घरात नेले व दरवाजा बंद करून त्याने सदर मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, मुलीने घडलेला हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.
त्यामुळे, पीडित मुलीच्या आईने पैठण पोलीस ठाण्यात धाव घेत या अत्याचार प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळास भेट देऊन आरोपी विरुद्ध बलात्कार व बाललैंगिक अत्याचार याकलमाखाली गुन्हा दाखल केला. मात्र, या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत.