मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात गौरी-गणपती विसर्जनादरम्यान एका तरुण भक्ताचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणावर दुःखाचे सावट पसरले असून, स्थानिक पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

श्यामनगर परिसरातील ट्रॉमा केअर रुग्णालयाजवळ पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावावर शनिवारी सायंकाळी विसर्जन सुरू होते. 19 वर्षीय रोहित भीमसिंग राठोड हा तरुण गौरी-गणपती विसर्जनासाठी तेथे गेला होता. विसर्जन करत असताना अचानक कृत्रिम तलावातील पाण्यात किंवा तेथील वीज यंत्रणेत विद्युतप्रवाह उतरला. यामुळे रोहितला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्याच ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

मृत रोहित हा त्याच्या आई-वडिलांचा एकमेव मुलगा होता. काही वर्षांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते, आणि आता तरुण मुलाच्या अचानक जाण्याने त्याच्या वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.

स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विद्युत सुरक्षेची पुरेशी काळजी का घेतली गेली नाही? पाण्यात वीज उतरलीच कशी आणि सुरक्षेची खात्री नसताना भाविकांना तेथे प्रवेश का दिला गेला? असे थेट प्रश्न नातेवाईकांनी विचारले आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गणेशोत्सव समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिली. विसर्जन स्थळावरील कंत्राटदार आणि जबाबदार पालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, मेघवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू (ADR) म्हणून नोंद करण्यात आली आहे. कृत्रिम तलावाजवळील वीज व्यवस्था, सुरक्षेच्या उपाययोजना आणि प्रत्यक्ष घडलेला प्रकार या सर्वांचा पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.







