लोणी काळभोर, ता. 21 : गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक नियम जाहीर केले जात असताना, कवडीपाट टोलनाका परिसरातील गणपती विसर्जन मिरवणुकीत या नियमांची अक्षरशः पायमल्ली झाल्याचा आरोप होत आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (21 सप्टेंबर) झालेल्या विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांकडून डीजेचा दणदणाट आणि एलईडी लाईटचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. या वेळी आवाजाची पातळी 113 डेसिबलपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी पुणे पोलिसांनी चार बेस आणि चार टॉपची मर्यादा निश्चित केली आहे. मर्यादेपेक्षा अतिरिक्त साऊंड उपकरणे वापरल्यास गुन्हा दाखल करून साऊंड सिस्टीम जप्त करण्याचा इशाराही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता. प्रेशर-मिड आणि प्लाझ्मा उपकरणांच्या वापरावरही निर्बंध असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मग कवडीपाट टोलनाक्यावर नियमांचे उल्लंघन झाले असेल, तर कारवाई कुठे आहे? असा थेट सवाल आता परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

रविवारी कवडीपाट परिसरातील पाचपेक्षा अधिक गणपती मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात, यासाठी लोणी काळभोर पोलिस ठाण्याकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश बोराटे, सोमनाथ नाळे, सतीश गोडसे, पोलिस उपनिरीक्षक योगेश पैठणे, जगताप, अनुराधा मेहेर यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर होते.

दरम्यान, ‘ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, 2000’नुसार परिसराच्या प्रकारानुसार ध्वनीची अनुमत मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. निवासी भागात दिवसा 55 डेसिबल, तर रात्री 45 डेसिबलपर्यंत ध्वनीची मर्यादा आहे. शांतता क्षेत्रात ही मर्यादा आणखी कमी असून, दिवसा 50 डेसिबल आणि रात्री 40 डेसिबल अशी आहे. कवडीपाट टोलनाका येथील गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, मिरवणुकीदरम्यान डीजेच्या मोठ्या आवाजामुळे आणि एलईडी लाईटच्या वापरामुळे परिसरात कर्णकर्कश वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. मग डीजेचा हा मोठा आवाज पोलिसांच्या नजरेतून कसा सुटला? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच, या दणदणाटाला चाप कधी बसणार? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
आदेशांची अंमलबजावणी फक्त कागदावर?
ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर पुणे शहरात सध्या न्यायालयीन पातळीवरही चर्चा सुरू आहे. ‘महेश विजय बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य’ या प्रकरणातील न्यायालयीन निर्देशांमध्ये ध्वनीप्रदूषण नियंत्रण, तक्रारींवर तत्काळ कारवाई आणि नियमांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला आहे. न्यायालयीन आदेशांच्या पालनावर देखरेख ठेवण्याची प्रक्रिया यापूर्वीही करण्यात आली आहे. याशिवाय, यंदा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांमध्ये ध्वनीपातळीचे मोजमाप करण्याची यंत्रणाही राबवली जात आहे. आवाज निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्यास पोलिस कारवाई करण्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पोलीस प्रशासन काय कारवाई करणार?
एकीकडे अतिरिक्त साऊंड सिस्टीमवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा, दुसरीकडे प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आरोप या विरोधाभासामुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कवडीपाट टोलनाका परिसरातील संबंधित मंडळांकडून नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे पोलिसांच्या तपासणीत निष्पन्न झाल्यास, त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाणार? साऊंड सिस्टीम जप्त होणार का? गुन्हा दाखल होणार का? याकडे आता परिसरातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.






