पुणे : राज्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. यातच सकाळपासूनच उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे. आज शुक्रवारी (ता.17) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम आहे. तर उन्हाचा चटका कमी अधिक होण्याचा अंदाच हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात पुढील 24 तासांसाठी वादळी पावसाचा इशारा असून, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. दिवस मावळतीला गेल्यानंतर हे बदल दिसणार आहे. दिवसभर मात्र प्रचंड उकाडा जाणवणार आहे. पुढील 24 तासांमध्ये उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात गारपीट आणि वादळी वा-यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
याशिवाय काही क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यताही आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. साधारण 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या या वाऱ्यांसोबत इथे हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.