पुणे : महाराष्ट्रात सध्या ढगाळ हवामान आहे, त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरु आहे. विदर्भ आणि कोकणात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पहाटे गारठा दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली आहे. पहाटे, संध्याकाळी व रात्री गारठा वाढला आहे. मुंबई, ठाणे व परिसरात गारठा जाणवत आहे. मात्र, दुपार नंतर उकाडा जाणवत आहे. दरम्यान, पुढील काही तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून यामुळे दिवसभर उष्णता व रात्री थंडी असे वातावरण राज्यात अनुभवायला मिळणार आहे.
राज्यात पुण्यासह काही जिल्ह्यात तापमानात कमालीची घट झाली आहे. यात सांगली, नाशिक, नागपूर, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात तापमानात 2 ते 4 अंश डिग्री सेल्सियसने घट झाली असून गारठा वाढला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्याच्या उत्तरेकडे असणाऱ्य़ा जिल्ह्यांमध्ये तापमानात घट नोंदवली जात आहे. इथं तापमान 13 अंशांपर्यंत खाली आले असून, आता उर्वरित जिल्ह्यांवरही त्याचे परिणाम दिसून येऊ शकतात. पुढील 24 तासांमध्ये धुळ्यातील तापमानावर लक्ष राहणार असून, इथं राज्यातील नीचांकी आकडा गाठला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. थोडक्यात उत्तर महाराष्ट्रात 13 अंश सेल्सिअस इतक्या तापमानासह गारठा दिवसागणिक वाढत जाणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.