पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्याने संपूर्ण राज्याचे राजकीय अवकाश ढवळून निघत आहे. राजकीय पक्ष निवडणुकांतून मोठमोठी आश्वासने देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतात.
निवडणुकीतील आश्वासनांद्वारे ‘मोफत संस्कृती’ वाढीस लागण्याबाबत मागे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असली, तरी ही त्याचा फारसा परिणाम राजकीय पक्षांवर झालेला दिसत नाही. उलट सर्व मर्यादा ओलांडत मतदारांना व्यक्तिगत लाभाची, कल्याणकारी योजना आणि विकासकामांची लालूच दाखवली जाते. याला आवर कसा घालायचा, हे न उलगडलेले कोडेच आहे.
लोकशाही मूल्यांची जपणूक आणि निवडणुकांच्या माध्यमातून त्याचे जागरण अपेक्षित असताना त्या तत्त्वालाच तिलांजली दिली जात आहे. या निवडणुकीपुरता विचार करायचा झाला तर, राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यांतून दिलेल्या आश्वासनांची भली मोठी यादी मतदारांचे डोळे पांढरे करणारी म्हणावी लागेल. निवडणुका पाच दिवसांवर आल्या असताना जाहीरनाम्यांचे हे पतंग उंचच उंच भरारी घेत आहेत.
या मैदानातील महायुती आणि महाविकास आघाडी सारख्या या प्रमुख आघाड्या युत्यानी जाहीरनाम्याद्वारे मोठमोठ्या आश्वासनांची खैरात केली आहे. त्यामुळे नेमक्या कुणाच्या आश्वासनांवर भरवसा ठेवायचा, असा प्रश्न महाराष्ट्रातील मतदारांपुढे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. सर्वच पक्षांनी महिला आणि तरुणांवर विशेष लक्ष केंद्रित केले, ही एक जमेची बाजू आहे. किमान या निमित्ताने तरी या वर्गाकडे गांभीर्याने पाहिले जाते आहे. महायुतीने आरक्षणाचा विषय हाताळताना अपयश आले असताना त्याला शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून आरक्षणाची पन्नास टक्क्यांपेक्षाची मर्यादा जास्त वाढवून देण्याचे आश्वासन दिले आहे. ते पूर्ण कसे करणार याचे कोणतेही उत्तर हाती नसताना या जाहीरनाम्यातील सर्वात मोठी आणि चर्चेची ठरत आहे.
महायुती सरकारने 24 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केले. महाविकास आघाडीकडून 48 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये बहुचर्चित महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणि या योजनेमध्ये राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत होते, आता वाढवून 2100 रुपये देणार असे जाहीर केले तर महिला मतदारांना आकर्षित करण्यात महाविकास आघाडीकडून 3000 हजार रुपये जाहीर केले. तसेच शेतकऱ्यांसाठी 3 लाख पर्यंत कर्ज माफी ची घोषणा केली तर महायुती ने संपूर्ण कर्ज माफीची घोषणा केली. या अशा मोठ मोठ्या अनेक घोषणा केल्याने मतदार राजा मात्र संभ्रमवस्थेत पडला असून विश्वास कोणावर ठेवायचा हा प्रश्न मात्र त्यांना योजना पाहून पडला असणार.