मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रीमंडळात मोठी घोषणा केली आहे. या बैठकीत मुंबईतील एन्ट्री पॉंईटवरील पाचही टोलनाक्यावर हलक्या वाहनांना आजपासून टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेच्या घोषणेकडे लक्ष असतानाच राज्य मंत्रीमंडळाची आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलवण्यात आली होती. ही मंत्रीमंडळाची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 19 महत्त्वाचे निर्णय…
– मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील टोल हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्री 12 वाजल्यापासून अंमलबजावणीला सुरवात
– पुणे मेट्रो रेल टप्पा-2 मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)
– कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)
– राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) 2.0 राबविणार
– राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)
– समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम
– आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)
– आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)
– पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)
– अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)
– मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)
– खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)
– किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)
– उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)
– दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)
– वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)
– खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)
– अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट
– मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची 3 पदे (वैद्यकीय शिक्षण)