पुणे : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. असे असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावाच्या वादावर सुनावणी झाली.
अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हाबाबत शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. घड्याळ हे चिन्ह तात्पुरते काढून घ्यावे, अशी विनंती शरद पवारांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात केली आहे. या याचिकेवर अद्याप निर्णय झाला नाही. आजच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने लवकरात लवकर हे प्रकरण सुनावणीसाठी घेणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच यासाठी नवीन तारीख दिली जाईल, असेही कोर्टाने सांगितले आहे.
यावेळी सिद्धार्थ शिंदे यांनी सुनावणीबाबत सांगितले आहे की, राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्षाबाबतचा निकाल निवडणूक आयोगाने फेब्रवारी महिन्यात दिला आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधातील प्रकरण सुप्रीम कोर्टात आले होते. तसेच शरद पवार यांनी अर्ज करुन त्यात म्हटले होते की, अजित पवारांना विधानसभा निवडणुकीसाठी घड्याळ चिन्ह काढून दुसरे चिन्ह द्यावे. या प्रकरणामुळे अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस दिली होती.
या प्रकरणी उल्लेख करताना शरद पवार यांच्या वकिलांनी अजित पवार यांना नवे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी केली. अजित पवार यांनी त्यांचे प्रतिज्ञापत्र कोर्टामध्ये सादर केले नसल्याचे नमूद करण्यात आले. तसेच त्यावर आमच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर निवडणुकीचे अर्ज भरले असल्याचे अजित पवार यांच्यावतीने सांगण्यात आले. कोर्ट सुनावणीची नवी तारीख दिली जाणार आहे.