गुहागर : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या एकूण 205 प्राथमिक शाळा व 20 केंद्रशाळा आहेत. यामध्ये पहिली ते चौथी व पहिली ते सातवीच्या शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक माहिती प्रणालीवर आधारित संक्षिप्त सांख्यिकीय माहितीचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला होता. पुढे तो शासनाकडे पाठविण्यात आला. यामधून तालुक्यातील 190 शाळांना हक्काचे क्रीडांगण नसल्याची बाब पुढे आली आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक शाळांची माहिती एकत्रित करून ती पुढे देण्यात आली. यामधून तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळा आजही भौतिक व भौगोलिक सुविधांपासून वंचित असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. गुहागर तालुक्यातील बीटस्तरीय व केंद्रस्तरीय हिवाळी स्पर्धा मात्र शाळेच्या शेजारी असणाऱ्या शेतामध्येच घेतल्या जाणार असल्याचे येथील शिक्षकांकडून सांगण्यात येते.
एकीकडे शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटत असताना आणि ग्रामीण भागातील पालकांची पसंती या शाळांना वाढत असताना मराठी शाळांमध्ये पटसंख्येचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी शाळांमधील पटसंख्या वाढावी यासाठी सर्व शिक्षण अभियानातून कोट्यवधींचा चुराडा होत आहे. तालुक्यातील 15 शाळांमध्ये छोटी क्रीडांगणे आहेत. मात्र, तालुक्याला एकही सुसज्ज असे क्रीडांगण नसल्याने तालुक्यामधून शासनाच्या कारभारावर रोष व्यक्त केला जात आहे.