नवी मुंबई: नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी पनवेलमध्ये घडली. स्नेहा आकाश गोडसे (२७) असे या महिला पोलिसाचे नाव असून पतीसोबत झालेल्या भांडणानंतर या महिला पोलिसाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी मृत महिला पोलिसाच्या पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या घटनेतील मृत महिला पोलीस शिपाई स्नेहा गोडसे या नवी मुंबई पोलीस मुख्यालयात कार्यरत होत्या. तसेच त्या पनवेल येथील मॅरेथॉन सोसायटीमध्ये पती आणि मुलासह राहत होत्या. त्यांचा मुलगा गावी असल्याने सध्या स्नेहा व त्यांचा पती हे दोघेच राहत होते. स्नेहाचा पती हा आयटी कंपनीत कामाला असून त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती स्नेहाला कळली होती. यावरून या दोघा पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. याच कारणावरून मंगळवारी दुपारी त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले.
त्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबत फोनवरून पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी धाव घेतली. यावेळी पोलीस दोघांची इमारतीच्या खाली समजूत काढत होते. याचवेळी स्नेहा यांनी आपल्या घरात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर पोलीस त्यांच्या घरी गेल्यानंतर स्नेहा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्या. स्नेहाने पतीसोबत झालेल्या भांडणानंतर आत्महत्या केल्याने पनवेल शहर पोलिसांनी स्नेहाचा पती आकाश गोडसे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे