उरण: शनिवारी रात्री दुर्मीळ अशा वाघाटीचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली. प्राथमिक अंदाजानुसार, वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून संबंधित घटनेमुळे परिसरातील इतर वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मांजर कुळातील अशा वाघाटी प्रजाती महाराष्ट्रात अतिशय दुर्मीळ मानली जाते. वाघाटी भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार अनुसूची १ अंतर्गत संरक्षित आहे. तसेच इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झव्हेंशन ऑफ नेचरच्या (आययूसीएन) जवळजवळ संकटग्रस्त यादीत समाविष्ट आहे. नवीन अधिवासाच्या शोधात कर्नाळा परिसरात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे वाघाटी नवीन शांत आणि सुरक्षित जागा शोधत असावी. उरणमधील खाड्या, झाडेझुडपे आणि पाणथळींमुळे तेथे अन्न सहज मिळते. यामुळे उरणमध्ये वाघाटी आढळून आल्याचे बोलले जात आहे. अशातच उरणमधील केगाव येथील स्टेलन कंपनीच्या परिसरात शनिवारी १२ एप्रिल रोजी रात्री मृत वाघाटी आढळून आली होती. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
वाघाटीच्या डोक्याला मार बसल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. मृत वाघाटीला शवविच्छेदनासाठी परळच्या बाई साकरबाई दिनशॉ पेटीट रुग्णालयात नेण्यात आले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर वाघाटीच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल, अशी माहिती वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
कसा आहे वाघाटी
वाघाटी हा मांजर कुळातील प्राणी आहे. बिबट्याच्या हुबेहूब लहान प्रतिकृतीसारखी वाघाटी दिसते. त्यांचा रंग व अंगावरील ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात. पश्चिम घाटाच्या काही भागात मर्यादित प्रमाणात हा प्राणी सापडतो. पाणथळ जागांमध्ये आढळणारा हा प्राणी मासे, बेडूक आणि लहान सस्तन प्राण्यांवर उपजीविका करतो. मांजर कुळातील प्राण्यांच्या एकूण १५ प्रजाती भारतात आढळतात.
भारतात असलेल्या एकूण मांजर कुळातील प्रजातींपैकी वाघाटी आहे. वाघाटी मुख्यतः उंदीर, घुशी अशा कृतकवंशीय प्राण्यांची शिकार करतात. त्यामुळे त्यांची पर्यावरण आणि अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका आहे. वाघाटी ही भारतातील रान मांजरीनंतर आढळणारी सर्वात सामान्य आणि व्यापक प्रजाती आहे.